सहकारी साखर कारखान्यांना नवसंजीवनी देण्यासाठी १३ सदस्यीय समिती; दोन महिन्यांत शासनाला अहवाल
महाराष्ट्रातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थिती, आर्थिक अडचणी आणि कारखाने बंद पडण्यामागील कारणांचा ही समिती अभ्यास करणार आहे.
राज्याच्या सहकार विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संयुक्त अभ्यासातून कारखानानिहाय आर्थिक व्यवहार्यतेचा आढावा घेतला जाणार आहे. समितीला दोन महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल आणि शिफारशी शासनाला सादर करायच्या आहेत.
२५ वर्षांत सहकारी कारखान्यांची संख्या घटली
एकेकाळी महाराष्ट्रात २०० पेक्षा अधिक सहकारी साखर कारखाने कार्यरत होते. मात्र, गेल्या २५ वर्षांत आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि अवसायन प्रक्रियेमुळे अनेक कारखाने बंद पडले किंवा विकले गेले. सध्या सुमारे ७५ सहकारी कारखाने स्वतःच्या व्यवस्थापनाखाली ऊस गाळप करत असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे. तर ३० ते ३२ कारखाने भाडेपट्टा किंवा भागीदारी तत्त्वावर खासगी व्यवस्थापनाकडून चालवले जात आहेत.
आधुनिक तंत्रज्ञान आणि उपपदार्थ निर्मितीवर भर
ऊस उत्पादन आणि साखर उतारा वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, जीपीएस, ड्रोन, यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन आणि मृदा आरोग्य यांचा अभ्यास समिती करणार आहे. तसेच इथेनॉल, संपीडित जैववायू, सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि जैव-रसायने अशा उपपदार्थांच्या निर्मितीद्वारे कारखान्यांचे उत्पन्न वाढवण्याचा आराखडाही तयार केला जाणार आहे.
अडचणीत असलेल्या कारखान्यांसाठी कर्ज पुनर्रचना, पुनरुज्जीवन निधी आणि बाह्य गुंतवणुकीच्या शक्यतांचाही विचार केला जाणार आहे.सहकारी साखर उद्योगाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यात ही समिती कितपत यशस्वी ठरते, याकडे आता साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.
