पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी महापालिकेची नवी यंत्रणा; १०० कर्मचाऱ्यांचे कस्टमर केअर युनिट उभारणार
छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून स्वतंत्र कस्टमर केअर युनिट उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या यंत्रणेसाठी जवळपास १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रस्तावित असून, नागरिकांना फोन, व्हॉट्सअॅप आणि ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून तक्रारी नोंदविता येणार आहेत.
शहरात पाणी कधी येणार, कमी दाबाने पाणी का येते, जलवाहिनीला गळती कुठे आहे, अशा प्रश्नांसाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांत जाण्याची गरज पडू नये, हा या व्यवस्थेमागील उद्देश आहे.
तक्रारींचा पाठपुरावा एकाच ठिकाणी
प्रस्तावित यंत्रणेत नागरिकांची तक्रार नोंदवल्यानंतर ती संबंधित अभियंत्यांकडे पाठविण्यात येणार आहे. तक्रारीवर झालेली कार्यवाही आणि कामाची सद्यस्थिती वरिष्ठ अधिकारी तसेच आयुक्तांना पाहता येईल. दर आठ दिवसांनी तक्रारींचा आढावा घेण्याचेही नियोजन आहे.
पाणीगळती रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर
दक्षिण कोरियातील जलव्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करून शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी डिजिटल नियंत्रण, सेन्सर्सच्या मदतीने गळती शोधणे आणि पंपांचे स्वयंचलित व्यवस्थापन अशा उपाययोजनांचा विचार करण्यात येत आहे.
महापौर समीर राजूरकर यांनी १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान दक्षिण कोरियातील सेऊल आणि डेजॉन येथे झालेल्या जलव्यवस्थापन अभ्यास कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या अभ्यासातून मिळालेल्या अनुभवाचा शहराच्या जलव्यवस्थापनात उपयोग करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले
